Saturday, March 2, 2024

प्रेरणा दिन पाठ , २१ फेब्रुवारी, २०२४. 


वरील निळ्या रंगाच्या ओळीवर क्लीक केले कि पाठ ऑडिओ ऐकता येईल. 






हरी ओम. 

मनशक्ती केंद्राचे संस्थापक आणि प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद यांनी २१ फेब्रुवारी १९६३ या दिवशी , सन्यास मार्ग स्वीकारला. स्वामीजींनी अनेक साधकांना अर्थपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन केले, पण त्यांनी स्वतःला रूढार्थाने "गुरु" म्हणून मानले नाही. कोणाचा खाली वाकून नमस्कार स्वीकारला नाही.  १९९३ मध्ये त्यांनी प्रकाश समाधी घेतली. पण दर्शनार्थ त्यांनी स्वतःचे कॊणतेही प्रतीक ठेवले नाही. 

स्वामीजींच्या शिकवणुकीने , त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आज पर्येंत हजारो साधकांचे जीवन सन्मार्गी लागले आहे. मनशक्ती केंद्र २१ फेब्रुवारी हा दिवस (सत्कार्याची) प्रेरणा दिवस म्ह्णून मानतात. व स्वामीजींच्या शिकवणुकीतून नवीन कार्य प्रेरणा घेतात. 

या विशेष प्रसंगी घेतलेले हे विवेचन सर्वांस प्रेरणा दायी ठरेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी. 

Tuesday, November 28, 2023

 पसायदान पाठ :  ४/१०/२०२३. 


पसायदान : माउलींचा उद्देश काय आहे ?    माणसाचा क्रम विकास !




अगोदर आपण गीता पाठ केले, मनाचे श्लोक सविस्तर समजून घेतले. आणि आता पसायदानाचा संदेश
 
विस्ताराने पाहात आहोत.  या सर्वांचा उद्देश काय आहे? हे आपले सांगणे, ऐकणे जर आपल्याला
 
सार्थकी  लावायचे  असेल  तर आपण  कोनत्या   दृष्टीने या सर्व गोष्टींकडे पहायला पाहिजे ?

 स्वामीजींनी आपल्याला यज्ञ प्रार्थना दिली. ती अशी :

वयं हवनं करिष्या महे I अस्मात  अती लोभम हर I 

गुणां स्मरामी , त्वाम शरणम अहं प्रपद्ये. I        आत्म ज्ञानायच  त्वाम शरणम अहं प्रपद्ये II 

आम्ही हवन करतो. आमच्या मधील दोष कमी  होवो. आमच्यातील गुण वृद्धिंगत होवो. त्या साठी आम्ही तुला

(अग्नी /प्रकाश देवतेला) शरण येतो.    आत्मज्ञान होवो, त्यासाठी आम्ही तुला शरण येतो. 

आणि या पार्थने नंतर प्रकाश प्रार्थना / ज्योती ध्यान याचा संदेश सविस्तर आहे. 

अखिल मानवतेचा कळवळा, सर्व भूत मात्रांबद्दल जिव्हाळा, सर्व कल्याणाची आस माउलींच्या चित्तात

जी आहे त्ती ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा दिसून येते. त्यासाठी मानवाच्या वर्तनातील बदल  महत्वाचा आहे

हे जन-मानसावर ठसवितांना  सद्गुणांचे पालन करणे आवश्यक आहे त्याचे प्रतिपादन त्यांनी

ज्ञानेश्वरीत अनेकदा केले आहे. 

सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमेश्वराचा महिमा वाढावा, याची ज्ञानदेवांस तळमळ

होती. त्यांनी या गुणांचे वर्णन करतांना आपला सारा अनुभव या ओव्यांत ओतला आहे. मराठी भाषा

बोलणाऱयांवर त्यांचे हे अनंत उपकार आहेत. 

लोकात, समाजात मैत्र निर्माण का होत नाही ?

मनुष्य जेव्हा इतरांना ते आपल्या सुखाचे साधन आहेत अशा दृष्टीने पाहू लागतो तेव्हा त्याची

निराशा होते. माणसा-माणसा मधले फार मोठे दुःख हे इतरांना आपल्या सुखाचे साधन समजल्यामुळे

निर्माण झालेले असते. मग नवीन मॉडेलची मोटार आणि सुंदर दिसणारी बायको यांना एकच दर्जा

प्राप्त होतो. 

अशा मनोवृत्तीमुळे ज्यांना साधन समजले जाते त्यांना आपल्या वासनांसाठी राबवितांना आणि

त्यांच्यावर अन्याय करतांना माणसाला काहीच वाटत नाही. त्यामुळे ज्या व्यक्ती अशा साधन होतात,

त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होते. आणि साधन समजल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या सुखाच्या

अपेक्षा पूर्ण करीत नाहीत तेव्हा आपल्या जीवनात देखील  दुःख निर्माण होते. 


लोकांना आपले साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते.  लोकांनी आपल्याला

चांगले समजावे, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे, असे त्याला वाटते. त्याचे गुण इतरांच्या लक्षत येऊ नयेत

त्याचे त्याला वाईट वाटते. आणि आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे

मानायला पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते आणि लोक वाईट, दुष्ट, कृतघ्न

आहेत असा तो निर्णय आपल्या मनाशी घेतो. पण दुसऱ्याचा तो त्यांच्या बाजूने  विचार करील तर त्याला आपली

चूक लक्षत येईल.  आपल्यासाठी सर्व  आहेत, आपण जगाचे केंद्र आहोत आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी

देवाने निर्माण केले आहे - असे माणसाने समजू नये.  

संत आपल्यास हेच सांगतात. म्हणून ते म्हणतात - खरे सुख हे आपले आपणच शोधायचे असते. ते आपल्यातच

असते. आत्मसुखाचे साधन जर इतर लोकांना मानले तर सुख कधीही मिळणार नाही. ते म्हणतात - माणसाने

कुणाला आपले समजू नये, या जगात कुणी कुणाचे नाही. 

हा जो विचार आहे तो अशा उच्च अध्यात्मिक भूमिकेवरून आहे. आणि माझे माझे करून  इतरांत गुंतू नये याचा

अर्थ प्रेम करू नये असं नाही . प्रेम करणे आणि प्रेमात गुंतणे हे दोन वेगळे प्रकार आहेत.  पहिले व्यापक

 आत्म्यावरील प्रेमाचे दर्शक आहे तर दुसरे विषयाच्या आसक्तीत अडकणे आहे. 

“भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे” या प्रार्थनेतील अर्थ अशा दृष्टीने व्यक्ती आणि समष्टी यांच्या कल्याणाच्या दृष्टीने

माउलींना अभिप्रेत आहे , तो आपण लक्षात घेतला पाहिजे. 

आपण पसायदानाचा अभ्यास करून काय साधायचे आहे ? 

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपल्याला जे हवे असते ते म्हणजे 

अखंड असणे ., अस्तित्व. 

ज्ञान, माहिती, समजून घेणे 

सुख, समाधान, आणि  शांती. 

त्यासाठी सत चित आनंदरूप आत्म्याशी, परमेश्वराशी आपण एकरूप झाले पाहिजे. 

असे  उपनिषदे, गीता सांगतात.  

आणि ते आपल्यास सर्व प्राप्त व्हावे यासाठी , आपल्यात चांगला बदल घडविण्यासाठी  ज्ञानेश्वर माउली

आपल्याकडे पसायदानात मागतात : 

जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. 

हे मागणे  त्यांच्या गुरूंकडे, परमेश्वराकडे आणि आपल्याकडे ( श्रोत्यांकडे ) करतात. 

त्यासाठी आपण जर आत्मपरीक्षण केले आणि स्वतःतील खलत्व कमी केले तर 

जे आपल्याला पाहिजे ते मिळेल. माणसाचा पारमार्थिक क्रम विकास होईल. 


विजय रा. जोशी. 










 पसायदान पाठ : ११/१०/२०२३


'पसायदान' हे जीवन घडवणारे मागणे आहे. 




 पसायदान अर्थाचे चिंतन प्रकाशाची वाट दाखविणारे मोठे साधन आहे. मानवाचे देणे घेणे ब्रह्मसुखाचें व्हावयाचे

असेल,  त्याचा परस्पर व्यवहार आनंदाचा व्हायचा असेल आणि एकूण समाजाचे जीवन सामंजस्याचे, कल्याणप्रद

आणि कृतार्थतेचे व्हावयाचे असेल तर 'पसायदाना' द्वारे माऊलींनी जे विचार दिले आहे त्याचा आपल्या बौद्धिक

घडणीमध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी 'पसायदाना' चे चिंतन प्रेरक आणि मार्गदर्शक होइल. 

हा दीप आपल्या हृदयमंदिरामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे.

या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पनावर  आज या ओवीच्या निमित्ताने चिंतन करू. 

स्वतःची सर्व संकटे विसरून सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचे हे मागणे माउलींच्या अति-विशाल अशा अंतःकरणातून

उमलले आहे. 

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत.

प्रसन्न होऊन माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या.  त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, 

९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश,

प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

-  खळ / दुष्ट लोकांबद्दल अधिक काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना. 

-  माणूस सत्कर्माने सुधारू शकतो, असा पूर्ण विश्वास.

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो.  सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात

स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो, 

-  खळ ,समाजात विविध रूपाने, मुखवटा धारण करून  वावरतात, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या माणसांना

 त्रास होतो, या दुष्ट लोकांचा जन्म देखील वाया जातो. 

-   काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना  सुद्धा 

  सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

- जे कर्म भगवंतासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या ऐहिक अथवा पारलौकिक सुखासाठी आहे त्याला ज्ञानेश्वर

 महाराज “अज्ञानाचा पुण्यमार्ग” असं म्हणतात. 

असे कोणतेही कर्म जे केवळ स्वतःसाठी आहे, स्वतःच्या वासनापूर्तीसाठी आहे, त्याला सत्कर्म कशाला म्हणायचे ? 

लोकांना आपले स्वार्थाचे साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते

आपल्यासाठी सर्व  आहेत, आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी देवाने निर्माण केले आहे, 

असे माणसाने समजू नये. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते.  आपण लोकांसाठी एवढा 

त्याग,कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला

खेद होतो, चीड येते. 

 सत्कृत्य आणि उपासना दोन्हीही  निरपेक्ष हवे. मग हळू हळू चित्त शुद्धी आणि चित्त शांती येते. 



विजय रा. जोशी 

 पसायदान , पाठ १८/१०/२०२३ 


 ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे  ९ ओव्यांचे पसायदान 






आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत. प्रसन्न होऊन

माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. 

त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे

 पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश, प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

मातेला आपल्या,मागास लेकराची अधिक काळजी वाटते.  तशी ज्ञानोबा माउलींना दुष्ट लोकांबद्दल अधिक

 काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना ते करत आहेत.  

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो

सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो अशी ते मागणी

करतात.  

काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना

सुद्धा सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते. 

आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास

 मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते. 

 -  सत्कृत्य निरपेक्ष हवे. 

खरे सत्कर्म ते; जे माणसाला परमात्म्यापर्येत पोहोचविते.  असे कर्म सर्वांकडून घडत राहो, आणि त्यातून सर्व

 

लोकांचे मैत्र होवो.  खरे ज्ञान सर्वांच्या वर्तनात येऊन त्यांचे प्रापंचिक तसेच पारमार्थिक सर्वांगीण कल्याण होवो . 


माझे चिंतन असे असावे :

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपले  सत्कर्म निरपेक्ष आहे का?

एकत्रित सत्कृत्य कार्यात आपला योग्य तो सहभाग आहे का ? 

अशा कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तीत / समूहात  मैत्र निर्माण होऊन त्यातून समाज, राष्ट्र , मानवता कल्याण-कार्य

होण्यासाठी आपण काही वेळ तरी लक्ष देतो का ? 

हे सर्व अधिक फलदायी होण्यासाठी मला माझ्यात काही सुधारणा करता येईल का ? 

दुरितांचे तिमिर जावो I  विश्व स्वद्धर्म सूर्ये पाहो I जो जे वांछील तो तें लाहो I प्राणीजात II ३ II

पापांचा अंधकार जावो. विश्व, स्वधर्मरूपी सूर्याने,  प्रकाशित होवो. प्राणीमात्र ज्याची इच्छा करील तो ते प्राप्त करो. 

दुराचरणातून जे निर्माण होते ते दुरित. अशा दुराचरणी पुरुषाचे आचरण माणुसकीला लाजवणारे

असते. पापांचा जोर होत होत तीं जशी वाढतील तसा त्यांस (आसुरी लोकांस) जीवंतपणींच नरकयातनांचा  

भोग घडतो. निषिद्ध कर्मापासून जे राजस आणि तामस सुख निर्माण होते तो केवळ

मृगजळासारखा सुखाभास असतो, सुख नसते. 

श्री तुकाराम महाराजांनी पापाची व्याख्या ‘पाप ते परपीडा’ अशी केली आहे. 

अशा या पापाचा अंधार गेला पाहिजे म्हणजे समाजात सौख्य नांदू लागेल. 

अमोल अशा मानवी जीवनाला उद्धस्त करणारा हा दुरितांचा अंधकार आहे. तो अंधार पूर्णपणे जाण्यासाठी 

स्वधर्मसूर्याचा उदय होणे आवश्यक आहे. 

तीच प्रार्थना ज्ञानदेवांनी पुढे केली आहे.

स्वधर्म म्हणजे जीवनातील प्रत्येक प्राप्त स्थितीतील स्वकर्तव्य. प्रकृती सर्वदा अगदी काटेकोरपणे

प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय फळ देत असते. त्यात रेसभरही इकडचे तिकडे व्हायचे नाही. 

आपल्यासमोर जे कर्तव्य असेल , जे अगदी आपल्या हाताशी असेल ते उत्तम रीतीने बजावून आपण

क्रमशः शक्ती संपादन करू शकू. 

ज्या समाजात आपण जन्म घेतो, ज्या कुटुंबात वाढतो, ज्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे

जीवन लाभले असते, त्या सर्वांना आपण काही देणे लागतो. ते ही आपल्याला स्वधर्माच्या द्वारे

फेडायचे असते. पण त्या ऐवजी जो  फक्त स्वतःलाच सर्वस्व मानतो, आणि स्वतःच्या देहसुखासाठी 

विषयोपभोग घेण्यात आयुष्य घालवितो.

माउलींना अशा सर्वांची अधिक काळजी वाटते. त्यामुळे सर्वांचे होणारे नुकसान न व्हावेसे वाटते.

या कळवळ्यातून त्यांच्या अंतःकरणातून ते आपल्याला सांगतात की जीवनात स्वतःच्या योग्य प्रयत्नांनी अनुकूल,

मंगल असा बदल करणे शक्य आहे, तसा होणे आवश्यक आहे. 

त्यासाठी  दुरितांचे म्हणजे पापाचे तिमिर म्हणजे अंधकार जाण्यासाठी ,

स्वधर्मसूर्याचा उदय व्हावा अशी ते प्रार्थना करतात.



विजय रा. जोशी. 





















पसायदान पाठ :  २५/१०/२०२३.  


संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी :  पसायदान. 






ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात

येतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी 

“आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा ।माझिया सकळां हरिच्या दासां।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.

संत तुकाराम म्हणतात,  ”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.

समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें  पसायदान असे आहे 

“कल्याण करी देवराया। जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।। 

संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

संत ज्ञानदेवांचे पसायदान हा आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण यात अनेक ठिकाणी

व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि परमार्थाच्या हिताची व्यवस्था बघितलेली आहे. 

अर्थात आपल्या खऱ्या हिताचे काय हे सहसा कोणाला कळत नाही. 

पसायदानात आपल्या खऱ्या हिताचे काय ते ठासून भरलेले आहे. फक्त प्रत्येकाने त्याचे यथार्थ चिंतन करून 

त्या दिशेने वाटचाल करणे मात्र महत्त्वाचे आहे. असे केले तर पसायदानात संत ज्ञानदेव नेमके जेथे घेऊन 

जाऊ पाहतात तेथे आपण जाऊ शकू. कोणत्याही क्षेत्रांत प्रवेश करताना पूर्वतयारी लागते.
 
ज्ञानेश्वरीत ही पूर्वतयारी सांगितलेली आहे –

एथ अविद्यानाशु हें स्थळ । मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ (ज्ञाने. १८.१२४३). 

गीतेचा विषय व प्रयोजन :  गीतेत अविद्येचा निरास करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल

(प्रयोजन) आहे.  अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. 

पसायदानाकडे त्याची अपेक्षित व्यापकता लक्षात घेऊन बघितले तरच त्याचे खरे महत्त्व पटेल. 

पसायदान केवळ शिष्याने गुरूंकडे म्हणजे संत ज्ञानदेवांनी संत निवृत्तिनाथांकडे मागितलेले नसून
 
संत हे ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ॥ (तु.गाथा. ११४०)
 
असे असल्याने तुमच्या आमच्या हितासाठी, तुमच्या आमच्या कडून काही मागणे मागितले आहे हे लक्षात

घ्यायला हवे. हे लक्षात घेतले तरच आपली जबाबदारी कळेल. पसायदान लिहून आज 700 plus वर्षे झाली परंतु

प्रत्यक्षात खळांची व्यंकटी सांडो । (ज्ञाने. १८.१७९४) असे संत ज्ञानदेव म्हणत असले तरी
 
ती खळांची व्यंकटी म्हणजे दुष्टांची तिरकस चाल गेलेली नाही. 

येथे साधक म्हणून माझ्या हिताच्या दृष्टीने माझ्यापुरता विचार करून माझ्यातील खलत्वाचे अंश

हुडकून ते काढून टाकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. 

इतरांतील खलत्व शोधत बसणे खऱ्या परमार्थात अपेक्षित नाही. माझ्यातील खलत्व काढून

टाकण्यापुरताच विचार करावा. 

व्यंकटी म्हणजे बोलण्याचा, विचारांचा तिरकसपणा आणि असे तिरकस वागणे, बोलणे, स्वार्थाने,

मोहाने होते.  ते प्रत्येकाने टाकावे असे मागणे संत ज्ञानदेव मागतात. आश्चर्य म्हणजे संत ज्ञानदेवांनी

स्वतःसाठी काहीही मागितले नाही तर जो समाज त्यांच्यासाठी काहीही करायला तयार नव्हता

त्याच्यासाठी मागितले; यावरून त्यांच्या विचारांच्या, मन:स्थितीच्या उत्तुंगतेची कल्पना सहज येते. 

आपल्या सारखे दुःख दुसऱ्याला न व्हावे यासाठी केलेला ज्ञान शुद्ध प्रयत्न म्हणजे अध्यात्म जगणे. 

संत अध्यात्म जगतात , परमार्थ साधतात, आणि  कसे करावे ते सोपे पणाने आपल्याला सांगतात. 



विजय रा . जोशी. 











 पाठ :  १ / ११ / २०२३. 


आढावा,  ओव्या १ ते ६ , चिंतन ओव्या ७ व ८. 




ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे. त्यांनी या या यज्ञाने संतुष्ट होऊन

आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना ! 

आपण संत संगतीचे महत्व जाणून घेतले. संतसंगती, सद्गुरू उपदेश पालन 

या सर्वांनी काय लाभ होऊ शकतो यावर काही चिंतन केले. अशा संत सज्जनांची मांदियाळी

निर्माण होवो आणि त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचे कल्याण घडेल , ते घडो अशी माऊलींची अपेक्षा

देखील व्यक्त झाली हे आपण पाहिले. (ओवी ४)  

अर्थात हे घडण्या अगोदर प्रत्येक मानवाने स्वतःत सुधारणा होण्यासाठी, आपापले खलत्व कमी करून

अंतरी सदभाव निर्माण होण्यासाठी काय करायचे आणि अशा सद्भाव असलेल्या लोकांची मैत्री होऊन

परस्पर कल्याणासाठी काय करायचे याचा विचार झाला. (ओवी २) 

अशा वर्तन क्रान्तितून मानवाच्या मनातील दुरिताचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातील मानवता

स्वधर्म , स्वकर्तव्य पालनाच्या ज्ञान प्रकाशाने उजळून गेल्यावर विश्वातील सर्व भूतमात्रांचे कल्याण

घडो आणि ज्याला ज्याची वांछ्या असेल ते ते त्यास प्राप्त होवो, मिळो , मिळेल असा आशीर्वाद

माउलींच्या अंतरंगातून व्यक्त झाला आहे. हा  (ओवीं ३,मधील) आशय आपण विस्ताराने पहिला,

त्याचा अभ्यास केला. 

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

कल्पतरू आणि चिंतामणी यांपेक्षाही संतांच्या ठायी अधिक गुण आहेत. संत ज्या साधनाने

हे सर्व अलौकिक प्राप्त करून देतात ते साधन म्हणजे त्यांची अलौकिक वाणी. म्ह्णून श्रीज्ञानदेव 

पुढे संतांच्या मांदियाळीच वर्णन ‘अमृताचे बोलते सागर’ असे करतात. 

कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील व अमृत मृत्यूचे भय घालविल; पण मनाला

शांती प्राप्त करून देतील असे नाही. शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे संत आहेत असे

ज्ञानदेव म्हणतात. (चंद्रमे जे अलांछन) पण त्या चंद्राला डाग आहेत, लांच्छन आहे, पण आमचे

संत मात्र अलांछन चंद्र आहेत. 

ते म्हणतात - चन्द्राच्या शीतल प्रकाशाची गोडी ही राजाला आणि

रंकाला जशी सारखीच  प्राप्त होते त्या प्रमाणे सर्व भूतमात्रांबाबत संताची समता असते. 

संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यात सामर्थ्यशाली आहेत. पण सर्व सामर्थ्या मध्ये

इतरांना तापदायक होण्याचा एक दुर्गुण निर्माण होत असतो. जसा उष्णकाळात मध्यान्हीचा सूर्य 

हा तापदायक असतो. हा कमीपणा संतांमध्ये नसतो. म्हणून ते तापहीन मार्तंड (सूर्य) आहेत. 

स्वतःच्या ज्ञानाने, आचरणाने शुद्ध , निर्मल असणारे, इतरांचे जीवन उज्वलीत  करण्याचे सामर्थ्य

असणारे पण इतरांना कधीही तापदायक न होणारे असे हे सुजाण सर्वांना सोयरे म्हणजे अत्यंत

जवळचे होवोत, वाटोत . 

माउलींच्या प्रसादरूपी विचारांचा आशय आपण पहिल्या ६ ओव्यांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

आणि त्याचा आपल्या जीवनात लाभ होण्यासाठी काय करणे शक्य आहे यावर काही चिंतन देखील

केले. 

आजच्या पाठात ओव्या ७ आणि ८ समजून घेण्याचा प्रयत्न, अभ्यास आपण करणार आहोत. 



विजय रा. जोशी. 












पसायदान महात्म्य. 

 
पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरीच होय. त्यात ज्ञानेश्वरी प्रमाणे काव्य आहे , तत्त्वज्ञान आहे. 
कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मार्ग आहेत. 




खलांच्या द्वारे आसुरी संपत्ती आणि ईश्वरनिष्ठ सज्जनांच्या द्वारे दैवी संपत्तीचे निर्देश आहे.
खलांच्या रूपाने तमाचा, स्वधर्माच्या द्वारे इच्छित फळ प्राप्त करून घेणाऱ्या लोकांच्या रूपाने रजाचा
आणि सज्जनांच्या द्वारे सत्वाचा असा त्रिगुणांचा विचार आहे. 
त्यात ज्ञानदेवांना प्रिय असणारे संत-स्तवन आहे, सद्गुरुंशी संवाद आहे, 
हा होईल दान पसावो’ या वरदानाने गुरुकृपेचा अनुभव व्यक्त झाला आहे. त्यात ‘विश्वेशरावो’ रूपाने
विश्वरूपदर्शन आहे. ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ या द्वारे जो मनुष्य देवरूप, आत्मरूप 
होतो तोच सुखस्वरूप होतो हा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष सांगितला आहे. 
म्हणजे ज्ञानेश्वरीची सर्व महत्वाची अंगे पसायदानात उतरली आहेत. त्यामुळे पसायदानाचा पाठ हा
सर्व भाव लक्षात घेऊन केला तर ज्ञानेश्वरीच्या पाठाचेच फळ त्याला आहे.  
पसायदान हा मंत्र आहे. 
पसायदान हे दिव्य प्रार्थनासुक्त आहे. 
पसायदान हा सर्व तत्व-विचारांचा एक संपूर्ण ग्रंथ आहे. 
किंबहुना पसायदान म्हणजे अपार कृपेने भरलेलं श्रीज्ञानेश्वरमाऊलींचे अक्षर रूपच आहे. 
आपल्या कल्याणासाठी त्या त्यांच्या वांग्मय रुपाला शरण जावे आणि जसे ओंकार रूप असलेल्या
परब्रह्माला ओंकारानेच आळवावे,     
म्हणावे -
आता विश्वात्मके देवे I येणे वाग्यज्ञे तोषावें I 
तोषोनि मज द्यावे I पसायदान हें II 



विजय रा, जोशी